सोलापूर : जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुंदर माझे कार्यालय या अभियानांतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार तानाजी सावंत, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तलाठी कार्यालयामध्ये प्रथम वडाळा, ता. उत्तर सोलापूर, व्दितीय मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर, व तृतीय वेणेगाव, ता. माढा , मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये, प्रथम लऊळ, ता. माढा, द्वितीय पुळूज, ता. पंढरपूर, तृतीय अकलूज, ता. माळशिरस तर तहसील कार्यालयामध्ये
प्रथम- तहसील कार्यालय माळशिरस व उत्तेजनार्थ-तहसील कार्यालय सांगोला, दक्षिण सोलापूर यांना गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुंदर माझे कार्यालय अभियान जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कामाचे कौतुक केले. असेच अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी राबवावे त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत या अभियानासाठी लोकसहभागातून तीन कोटी खर्च झाले मात्र यापुढे आणखी पाच कोटी रुपये सरकारकडून जिल्हा प्रशासनाला देण्याची घोषणा करत महसूल विभागाचे सर्वच कार्यालय सुंदर आणि स्वच्छ करा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रास्ताविक करत सुंदर माझे कार्यालय उपक्रम राबविण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी यावेळी सुंदर माझे कार्यालय या अभियानावर तयार करण्यात आलेली चित्रफीत मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आली, कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांत अधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी नागेश पाटील तहसीलदार अंजली मरोड, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार अभिजीत पाटील यांच्यासह पंढरपूर, माळशिरस तालुक्याचे तहसीलदार इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















