सोलापूर : शोले चित्रपटांमध्ये ज्येष्ठ अभिनेते आसरानी यांचा एक डायलॉग कायम प्रसिद्ध आहे. आधे इधर जाओ, आधे उदर जाओ, बाकी सारे मेरे पीछे आओ. कार्यकर्त्यांनी तोंड फिरवल्याने आसरानी प्रमाणेच सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था झाल्याचे चित्र आहे.
राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसला काहीशी घरघर लागल्याचं चित्र आहे. तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी पद देण्यात आले आहे. पालकमंत्री असताना सर्वांना (काही ठराविक जणांना) सहकार्य करणाऱ्या मामांनी मोठ्या हौसेने सोलापुरात येऊन केवळ एकच बैठक घेतली. आता त्या बैठकीला तब्बल सहा महिने होऊन गेले आहेत यानंतर भरणे मामा सोलापुरात एकदाही आले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एका नेत्याने मामांना सोलापुरात येण्यासंदर्भात फोन केला असता ‘मला एवढी कामे असतात की सोलापूरला यायला जमत नाही’ असे त्यांनी सांगून टाकले.
शहर कार्याध्यक्ष पदावरून संतोष पवार यांना पक्षाने काढून त्यांना प्रदेशचे सचिव पद दिले त्यानंतर संतोष भाऊ काही कार्यक्रमात दिसले. सध्या ते कुठेही दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलने होतात त्यामध्ये केवळ महिला राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय दिसून येतो. युवती काँग्रेसच्या आंदोलनाला तर कार्यकर्ते सुद्धा नसतात. युवक राष्ट्रवादी काँग्रेस हवेतून खाली येत नाही, नुकतच काँग्रेस भवनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यासह माजी महापौर मनोहर सपाटे हे उपस्थित होते.
यावेळी आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्याचे निर्धार करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून नसलेले महेश कोठे यांना मात्र हे चांगलेच बोचल्याचे समजते. नेते शरद पवार यांनी महापालिकेची जबाबदारी आपणावर दिली असताना मला न सांगता काँग्रेस भवनात जाऊन महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे अण्णा यांचे म्हणणे आहे. आपल्या विचाराचा शहराध्यक्ष करावा यासाठी अण्णा आग्रही असून सुधीर खरटमल यांच्या डोक्यावर शहराध्यक्ष पदाच्या बोजा टाकण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
पक्षातील गटबाजी पाहून महेश अण्णांच्या विश्वासावर राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या सुधीर खरटमल (बॉस) आणि माजी महापौर नलिनी चंदेले (ताई) यांचाही कुठे मेळ लागत नसल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष पद, युवक अध्यक्ष पद हे बदलणार असल्याची चर्चा असल्याने पक्ष व संघटन वाढीसाठी कोणाचाही सध्या इंटरेस्ट दिसत नाही अशी काहीशी अवस्था सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे.

















