सोलापूरः नॅशनल वाॅटर अॅवाॅर्ड विजेत्या महूद बुद्रूक (ता. सांगोला, जि. सोलापूर) गावाने आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपणाने माझी वसुंधरा अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच डाॅ. सिंह यांनी महूद बुद्रूक गावाच्या समग्र ग्रामविकासासाठी कासाळगंगा फाऊंडेशनचे ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे हे असतील, अशी घोषणा केली.
माॅडेल व्हिलेजच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी महूद ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी लुबाळ यांच्या अध्यक्षतेखाली रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीवेळी माझी वसुंधरा अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वामी यांच्या उपस्थितीत त्यासंबंधाने पहिली बैठक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीसाठी डाॅ. सिंह, चिन्मय, ऋतुजा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मीता पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कार्यकारी अभियंता पंडित भोसले , यशदा चे निवृत्त वरिष्ठ अधिकारी सुमंत पांडे, अग्रणी नदी पुनर्जीवनाचे समन्वयक नरेंद्र चुग, नमामि गोदा फाऊंडेशनचे प्रमुख राजेश पंडित, आदिनाथ ढाकणे, उपसरपंच महादेव येळे आदी उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी पुढील लोकसंख्येचा विचार करता, गावाच्या परिसरात अडीच लाख तुळशीच्या रोपांची लागवड करावी, असे मार्गदर्शन डाॅ. सिंह यांनी केले.
लोकसहभाग कौतुकास्पद ः डाॅ. सिंह
वसुंधरा, पृथ्वीच्या रक्षणासाठी पर्यावरणपूरक जीवनप्रणालीचा अवलंब करणे किती आवश्यक आहे, यावर भर देत डाॅ. सिंह यांनी गावाच्या लोकसहभागाचे आणि एकजुटीचे कौतुक केले. समग्र ग्रामविकासासाठी गाव एक आल्याचा आनंदभाव त्यांनी मांडला.
बंधाऱ्याचे काम लागणार मार्गी ः धोत्रे
माझी वसुंधरा, आदर्श गाव योजना आणि शासकीय योजनांची माहिती देत श्री. धोत्रे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरच्या नळकनेक्शनसाठी वाॅटर मीटर लावण्यासाठी सहकार्य केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सहा महिन्यात शोषखड्डे उपक्रम सहा महिन्यात गावाने राबवण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. गावच्या शिवारातील बंधाऱ्याचे काम मार्गी लागेल, अशी माहिती उपस्थितांना दिली.
वसुंधरा समृद्धीसाठी एकजूट महत्वाची ः शेळकांदे
वसुंधरेच्या समृद्धीसाठी एकजूट महत्वाची आहे, याकडे लक्ष वेधत श्री. शेळकांदे म्हणाले, की ग्रामपंचायतीच्या गायरानावरील फळबाग लागवड करुन उत्पन्न वाढीच्या जोडीला निसर्गाच्या सान्निध्यात आपले जीवन सुककर कऱणे शक्य आहे. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
निधीची उपलब्धता ः सौ. पाटील
सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी गावच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीच्या उपलब्धतेची माहिती सौ. पाटील यांनी दिली. माझी वसुंधराची शंभर टक्के अंमलबजावणी ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.
……………………………………………
घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावण्यासोबत माझी वसुंधरा अभियान यशस्वी होण्यासाठी महूदकरांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. याशिवाय आरोग्य रक्षण, करिअर मार्गदर्शन याविषयी महूद ग्रामस्थांना मदत केली जाईल.
-श्री. दिलीप स्वामी (मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद)
…………….
आम्ही महूदकर ः चिन्मय आणि ऋतुजा
सामाजिक सामिलकीच्या भावने महूदच्या समग्र ग्रामविकासामध्ये ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून मिळालेल्या संधीचा अभिमान वाटतो. आता आम्ही महूदकर झालो आहोत. यापुढील काळात वसुंधरासह सगळ्या कामांमध्ये आम्ही महूदकरांसोबत राहू, अशी ग्वाही अभिनेते चिन्मय उदगीकर आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी दिली. तसेच कासाळगंगा ओढा पुनर्जीवनातून शेतकऱ्यांच्या जीवनात मिळालेल्या स्थैर्याची, ओढा पुनर्जीवन कामाची पाहणी दोघांनी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
…..




















