मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील सितामाई तलावाजवळ ऊसतोड ट्रॅक्टर चालक रमेश केशव मिसाळ राहणार खोकरमोहा ता. शिरूरकासार जि. बिड या 34 वर्षीय इसमाचा लाकडी काठीने मारून खुन केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, मंद्रूप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी बाळू भानुदास पवार हे सीतामाई तलाव मंद्रूप येथे 4 झोपड्या करून राहत असून दिनांक 31 ऑक्टोबर रोजी बाळू भानुदास पवार हे झोपडीत झोपले असताना रात्री 11 वाजण्याचे सुमारास मुकादमच्या झोपडीसमोर आरडाओरडा केल्याचा आवाज येत असल्याने फिर्यादी व त्याचा भाऊ बालाजी दोघे जागे झाले. झोपडीच्या आतूनच ताडपत्री बाजूला सारून पाहिले असता मुकादम अभिमान साबळे व अशोक गिरी यांच्या झोपडीजवळची लाईट चालू होती.
त्याठिकाणी मुकादम अभिमान साबळेचा मित्र रमेश मिसाळ याने मुकादमची बायको मनीषा हिला काहीतरी वाईट बोलल्याने त्यांच्यात वाद चालू होते. अभिमान साबळे, अशोक गिरी, मलप्पा कांबळे, मनीषा साबळे, अंजना गिरी यांनी रमेश यास मारहाण करत होते. त्याचवेळी अभिमान साबळे याने जवळच पडलेली एका लाकडी काठीने पाठीवर, दोन्ही पायावर,तोंडावर मारहाण करत असतानाच मलप्पा कांबळे, मनीषा साबळे, अंजना गिरी यांनीही रमेश यास मारहाण करू लागले. या मारहाणीत रमेशचा जीव ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत पोत्यात भरून मुकादम अभिमान साबळे याच्या झोपडीत ठेवले होते.
म्हणून आरोपी अभिमान बाजीराव साबळे , अशोक बगीनाथ गिरी दोघे रा.मलकाचीवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड, मलप्पा मळसिद्ध कांबळे राहणार सादेपूर तालुका दक्षिण सोलापूर, मनीषा अभिमान साबळे, अंजना अशोक गिरी दोघी राहणार मलकाचीवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांना अटक करण्यात आली आहे.
म्हणून या पाच लोकांविरुद्ध भारतीय दंड संहिता 302,201,323,143,147, 148,149 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांनी भेट दिली. अधिक तपास मंद्रूप पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे हे करीत आहेत.


















