सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महम्मद पैगंबर यांच्या बद्दल अनुद्गार काढणाऱ्या भाजप प्रवक्ते नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांना तुरुंगात टाका व या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
दरम्यान आडम मास्तर यांनी देशामध्ये गरिबी, बेरोजगारी, महागाई असे अनेक प्रश्न असताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केवळ हिंदू-मुस्लीम या दोन समाजात भांडणे लावण्याचे काम करत आहेत. यामुळे जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन झाली आहे. तब्बल 43 देशांनी मोदी यांचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे या दोन प्रवृत्तीवर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाका अशी मागणी मास्तर यांनी केली.
यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव एडवोकेट एम एच शेख नसीमा शेख नलिनी कलबुर्गी, सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ मेजर, व्यंकटेश कोंगारी, अनिल वासम, मुन्ना कलबुर्गी, अकिल शेख, दत्ता चव्हाण, अफसाना बेग, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला यांच्यासह कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.