सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भा.ज.पा. आमदार यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती खुद्द राम सातपुते यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही.
आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांचे आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”,अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे.
राम सातपुते हे भा.ज.पा.चे युवा आमदार आहेत. आपल्या पक्षाची रोखठोक आणि आक्रमक पद्धतीने बाजू मांडण्यासाठी त्यांची राज्यभरात ओळख आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.
आज विविध कामांसाठी मतदारसंघात ते गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. आपण सुखरुप असल्याचं त्यांनी व्हि.डि.ओ. जारी करुन सांगितलं आहे. अपघातानंतर राम सातपुते यांनी व्हि.डि.ओ. जारी करत म्हटलं आहे,
“मतदारसंघातील प्रवासादरम्यान माझा अपघात झाला. यामध्ये गाडीचे तीन टायर फुटले. परंतु जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, आजपर्यंत माझ्या हातून जे काही पुण्य घडलं तसेच पांडुरंगाच्या कृपेने मी या अपघातातून सुखरूप बचावलो. तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादाने माझ्या केसालाही धक्का लागला नाही.
मला आणि माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा अथवा काहीही दुर्घटना घडलेली नाही”. राम सातपुते यांच्या अपघाताचं वृत्त समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखं पसरलं.
तेव्हापासून तालुक्यातील तसेच राज्यसभरातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे त्यांना फोन यायला सुरुवात झाली. परंतु गाडीचे तीन टायर जरी फुटले असले तरी माझ्या केसालाही धक्का लागला नाही, त्यामुळे कुणीही काळजी करु नये, असं आवाहन राम सातपुते यांनी केलं आहे.

















