सोलापूर | पूर्वाश्रमीची राष्ट्रवादी काँग्रेसची तोफ, पवार साहेबांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे मात्र अजितदादांशी कधीच न पटणारे नेते, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर. हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राहूनही सरांना पक्षाने मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले नाही, ते अपक्ष लढले, पराभव झाला,
भाजपचे सरकार राज्यात आले, भाजपने सर्वांचीच अडचण करण्यास सुरुवात केली, सर शिक्षण सम्राट, सरांच्या अनेक संस्था, सुतमिल. सरांनी भाजपशी जवळीक केली, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना हार घालताना ते त्यांच्या पाया पडले, तो फोटो इतका व्हायरल झाला की, सरांवर टीकेची झोड उठली. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या जवळ गेले मात्र बापूनी जास्त अंगाला लावून घेतलं नाही.
शेवटी जानेवारी 2019 मध्ये त्यांनी जालना इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ काढून टाकले व भाजपचे कमळ हाती घेतले. सरांच्या डोक्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघ होता, शरद बनसोडे यांच्या कारनाम्यांना भाजप वैतागले होते, इतर दुसरा कुणी उमेदवार नव्हता, सरांना वाटले आपली डाळ शिजेल मात्र हिरमोड झाला, बोगस माणसाला दाखला देऊन भाजपने खासदार केले. शेवटी सरांनी माळशिरस व मोहोळवर आशा लावली. परंतू, सरांचा विचार झाला नाही,
निवडणूका झाल्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, मात्र तीन तिघाडी, काम बिघाडी, सरकार असल्याने ते कधी ही पडू शकते ही आशा ठेवत सरांनी भाजप सोबतच राहणे पसंत केले आहे, सध्या ते निवडणुकांमध्ये स्टेज गाजवत आहेत, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक आपल्या भाषणाने चांगलीच गाजवली, अजित पवारांवर मनसोक्त तोंडसुख घेतले, भाजपने निवडणूक जिंकल्याने सरांसह सर्वांचेच “समाधान” झाले.
अजूनही सरांचा विचार भाजप कुठे ही करत नसल्याचे चित्र आहे. सध्या ते आपल्या बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून निर्धार संवाद अभियान राबविणार आहेत, मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी ते आवाज उठवत आहेत. दरम्यान पत्रकारांनी भाजप कडून काय अपेक्षा आहेत अशी विचारणा केली, तेव्हा त्यांनी विमानतळावर फक्त स्वागत करण्यापुरते प्रोटोकॉलमध्ये बसलो तरी बस्स असे सांगून नाराजी तर व्यक्त केलीच मात्र ज्येष्ठतेचा विचार व्हावा अशी अपेक्षा ही व्यक्त केली.



















