सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे हीच व्यक्ती सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना एकाच टेबलावर वर्षानुवर्षे कसे काय ठेवले जाते हा मुळात मोठा प्रश्न आहे. माध्यमिक शिक्षण विभाग विस्तार अधिकारी या टेबलावर एक नाही दोन नाही तर तब्बल अकरा वर्ष ठेवणे म्हणजे एकप्रकारे भ्रष्टाचाराला शासनानेच चालना दिल्यासारखे आहे.
जिल्हा परिषदेला संवेदनशील असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी मिळाले, शिक्षण विभागाला आशेचा ‘किरण’ म्हणून लोहार मिळाले. मात्र त्यांनी अशा अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्याऐवजी उलट पाठराखण केल्याचं चित्र पहायला मिळत. आता अशोक भांजे यांच्या अनेक प्रकरणांची चर्चा जिल्हा परिषद मध्ये होऊ लागली आहे. शिक्षण विभागात तर त्यांचा एकाच टेबलावर मुक्काम असताना दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदावर सुमारे दहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी आपला जम बसवला असल्याची माहिती मिळाली आहे.
यापूर्वी सुमारे आठ वर्षे आणि आता जवळजवळ दोन वर्षे होत आली ते अक्कलकोट तालुक्यात आहेत. अक्कलकोट तालुक्यात जवळपास 27 हजार विद्यार्थी, साडेनऊशे शिक्षक असताना 20 केंद्र प्रमुख पैकी केवळ सहा केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. दोन विस्तार अधिकारी आहेत, ते सुद्धा प्रभारी आहेत. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात शिक्षण विभागाचा खेळखंडोबा झाल्याचं चित्र आहे. किती शिक्षक शाळेत शिकवतात? किती बाहेर फिरतात? शाळेत शिक्षकांनी तर पाच ते दहा हजार रुपये मानधनावर स्वतःच्या जागेवर शिक्षक ठेवले असून स्वतः बाहेर पुढारपण करत फिरत आहेत असं चित्र अक्कलकोट तालुक्यात असल्याचे बोलले जाते.
नुकतच पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सभापती सह इतर सदस्यांनी गट शिक्षणाधिकारी अशोक भांगे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र असा संताप व्यक्त केला जर अशी परिस्थिती असेल तर अक्कलकोट तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार असे ताशेरे सर्व लोकप्रतिनिधींनी भांजे यांच्यावर ओढल्याचे समजले.
याचबरोबर भांजे यांच्यावर आरोप होत आहेत की, अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी गावातील कन्नड शिक्षक तीन दिवस अटक असताना त्या शिक्षकाला शाळेवर हजर राहण्याचा रिपोर्ट दिला. तो शाळेवर हजर झाला, खानापूर मराठी शाळेतील एक शिक्षक बडतर्फ असताना त्याचे वेतन काढल्याचा आरोप होत आहे.

















