सोलापूर : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 132 वा जयंती उत्सव साजरा होत आहे. सोलापूरची आंबेडकर जयंती ही संपूर्ण जगात बघितली जाते, फ्रांसच्या कार्निव्हल नंतर सोलापूरची भीमजयंतीच्या मिरवणुकीला महत्व आहे. सर्व जाती धर्मातून लाखोंचा जनसमुदाय सहभागी होतो.
यंदा 13 एप्रिल रात्री बारा पासून ते 23 एप्रिल रविवार पर्यंत असा 10 दिवसांचा उत्सव साजरा केला जात आहे. जयंती नसून भीमसैनिकांची एकप्रकारे दिवाळी असते. कोरोना महामारीत गेलेल्या दोन वर्षांच्या गॅपनंतर 2022 साली मोठ्या उत्साहात मिरवणूक झाली. तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खास करून मिरवणुकीच्या दिवशी पुण्यावरून सोलापुरात येत आपला सहभाग नोंदवला. केवळ सहभाग नाही तर त्यांनी या मिरवणुकीत ठेका धरत भीमसैनिकांच्या उत्साहात भर घातली.
दरम्यानच्या काळात राज्यात सरकार बदलले, भारतीय जनता पार्टी मधील अभ्यासू व ज्येष्ठ मानले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राज्याचे महसूल मंत्रीपद असून त्यांच्याकडेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्यांचा आज 8 एप्रिल रोजी सोलापूरचा दौरा होत आहे. त्यानंतर ते कधी येणार हे मात्र कुणी सांगू शकत नाही.
परंतु सोलापूरच्या डॉक्टर आंबेडकर जयंतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. जितकी गर्दी 14 एप्रिल रोजी अभिवादनाला असते त्यापेक्षा शंभरपट गर्दी 23 तारखेच्या मिरवणुकीला असते त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या उत्सवात आपला सहभाग नोंदवणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.


















