सोलापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्थात NRHM च्या कंत्राटी सोलापूर जिल्हा व्यवस्थापक वैशाली थोरात यांचा पदभार बदला अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे. अध्यक्ष कांबळे यांनी गुरुवारी तसे पत्र सीईओ स्वामी यांना दिले.
मागील काही दिवसात राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये बराच गोंधळ समोर आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे यांनी दिलेल्या पत्रामध्ये, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कंत्राटी जिल्हा व्यवस्थापक वैशाली थोरात यांच्या गेल्या १० वर्षाच्या कारभाराबाबत बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. मानधन, प्रवासभत्ते व पगारबील जाणीवपूर्वक प्रलंबीत ठेवून ठराविक बँकेत रक्कमा डिपॉझिट ठेवल्याबाबत सिंहासनच्या बातमीत आक्षेप घेण्यात आला आहे.
त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी व तोपर्यंत त्यांना पदावरून दूर ठेवण्यात यावे. डाटा ऑपरेटर नागेश चौधरी यांच्या नियुक्तीबाबत संशय व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करावा. अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती रजनी बाळासाहेब देशमुख यांना आलेल्या महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाच्या पत्रात थोरात यांच्या प्रमाणपत्र पडताळणीत गंभीर बाब समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे थोरात यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अध्यक्षांच्या पत्रावरून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे काय निर्णय घेतात याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

















