सोलापूर : उच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान, न्यायमूर्तींची बदनामी तसेच जाती- धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सोलापुरात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश नागनाथ पवार यांनी भादंविसक १५३ (अ) (ब), ५००,५०५ (१ (२), सह न्यायालय अवमान अधि १९७१ चे क२ (ग) (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
योगेश पवार यांनीदिलेल्या फिर्यादीत, २७/०६/२०१९ रोजी उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायाधिश रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाचे अनुषंगाने सदावर्ते यांनी टिव्ही ९ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे यांनी दिलेल्या निकालाविरूध्द नापसंती दर्शवून त्यांचे निर्णयावरच शंका घेवून न्या. रणजित मोरे हे मराठा जातीचे आहेत असे म्हणून त्यांची जात काढून मराठे हे शुद्र आहेत अशी भाषा वापरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे दबावाखाली मराठा समाजाच्या बाजूने सेंटीग बेंटीग करून निकाल दिला आहे असे म्हणून न्यायाधिशाविषयी जातीय व्देषातून अवमान कारक भाषा वापरून न्यायमुर्तीची बदनामी केली तसेच न्यायनिर्णयावर संशय घेवून मराठा समाज व ओबीसी जाती, खुल्या प्रवर्गातील ब्राम्हण, वैश्य, आर्या या जातीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ए.बी.व्ही.पी. संघटनेमध्ये व्देष निर्माण होवून त्यांच्यात जातीय तेढ निर्माण होवून सार्वजनिक शांतता भंग होईल असे चिथावणीखोर वक्तव्य करून मराठा समाजाबद्दल जातीय व्देष निर्माण केलेला आहे.


















