सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव भैरवनाथ गुरप्पा नवले यांना 20 लाखाचा अपहार केल्या प्रकरणी सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे अवसायक व्ही व्ही डोके यांनी निलंबित केले. गुरुवारी डोके यांनी तसा आदेश काढला.
विंचूर संस्थेचे सचिव नवले यांच्या गैरकारभाराबाबत सोलापूर जिल्हा सहकारी बँक निंबर्गी शाखेचे बँक इन्स्पेक्टर एस एस अपराध यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून एफ डी राठोड अप्पर लेखापरीक्षक सहकारी संस्था यांची चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
चौकशीनंतर वस्तुस्थिती व अभिप्राय पाहता संस्थेच्या मुख्यतः दप्तरी कामकाज पाहण्याची जबाबदारी संस्था सचिवाची असते. संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीप्रमाणे व बँक धोरणाप्रमाणे संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना कर्जाचे वाटप करणे, सभासदाकडून कर्ज वसुलीच्या रक्कमा स्विकारून संबंधितांना संस्थेच्या जमा पावत्या देणे, सभासदाकडून जमा झालेली कर्जाची रक्कम ज्या त्या वेळी संस्थेच्या नजिकच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बँक चालु/कर्ज खाती भरणा करणे व संचालक मंडळाच्या मंजुरीने रक्कम खर्ची करणे इ. मुख्य जबाबदारी संस्थेचे तत्कालीन सचिव भैरवनाथ गुरण्णा नवले यांची असताना त्यांनी ती जबाबदारी पार पाडले नसल्याचे दिसून येते. तक्रार अर्जातील मुद्द्याच्या अनुषंगाने संस्थेचे चेअरमन भिमगोंडा बापुराव पाटील व तत्कालीन सचिव नवले हे सकृत दर्शनी जबाबदार असल्याचे चौकशी अहवालात दिसून येते. असे चौकशी अधिकारी एफ.डी. राठोड, व्दितीय अप्पर लेखापरिक्षक, सहकारी संस्था सोलापूर यांनी चौकशी अहवालत नमुद केले आहे.
आदेश :
सोलापूर जिल्हा देखरेख सहकार संस्था म. सोलापूर पोटनियम क्र. १५(अ) १० (क) मध्ये निर्देश केलेले व सचिव सेवानियमातील नियम क्र. २६ जोडपत्र उपनियम क्र. ३(अ) व उपनियम क्र. अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी व्ही. व्ही. डोके अवसायक सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था म. सोलापूर आदेश देतो की, भैरवनाथ गुरण्णा नवले सचिव विंचूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म. विंचूर ता.द.सोलापूर याना पुढील आदेशापर्यंत निलंबीत करण्यात येत आहे.




















