सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील राजकुमारी महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेने मोहोळ तालुक्यातील ४७ दूध संस्थांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी याचिकेत केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हरकतीद्वारे जिल्ह्यातील ५४ संस्थांची नावे दूध संघाच्या फेरयादीत समावेश झाली आहेत. नव्याने समावेश झालेल्या ५४ दूध संस्थांमध्ये एकट्या मोहोळ तालुक्यातील ४७ संस्था आहेत. जिल्ह्यातील अवसायनात काढलेल्या ९०४ पैकी माढा मोहोळ, करमाळा व मंगळवेढा या तालुक्यातील जवळपास ३७५ संस्थांना सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने सहकार मंत्री व सहायक निबंधक (दूध ) यांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. न्यायालयाने स्थगिती देताना कार्यरत संस्थांचा मतदार यादीत समावेश करण्याबाबत विचार करावा, असे म्हटले होते.
प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आलेल्या हरकतीमधून मतदार यादीत समाविष्ट झालेल्या संस्था या सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिलेल्यामधील आहेत. त्यामुळे त्या ४७ संस्था मतदान यादीतून वगळण्याची मागणी याचिकेत केली आहे. यावर सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होती. उच्च न्यायालयाने राजन पाटील यांच्या बाजूने निकाल दिला असून मतदारयादीत एकदा समाविष्ट झालेल्या संस्था या मतदार म्हणून गणल्या जाणार आहेत.
या निकालावर प्रतिक्रिया देताना राजन पाटील म्हणाले, आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास होता, केवळ कायद्याचा आधार घेऊन सत्तेमध्ये शिरकावप करण्याचा केविलवाणा प्रकार होता. तालुक्यात स्वर्गीय बाबुराव अण्णांना मानणारा मोठा वर्ग असल्याने जनता या तालुक्यात इतर कुणाला थारा देत नाही. आता आमची महाविकास आघाडी व आमदार बबनराव शिंदे, व माजी मंत्री दिलीप सोपल यांची ताकद वाढली. आता 61 पैकी 57 मते आमची आहेत.त्यामुळे कोण कुठे ही उभा राहील. उत्तर तालुक्याला 1 जागा मिळेल का? या प्रश्नावर ते म्हणाले, आता कुणाला किती जागा द्यायच्या हे श्रेष्ठी ठरवतील.
















