पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते तथा विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालकेंसह (Bhagirath Bhalke) अधिका-यांसह चौघांवर पंढरपुरात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गैरव्यवहारातून हा गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरपूर तालुक्याचा राजवाडा असलेल्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा पेट्रोल पंप असताना गैरव्यवहार करता यावा यासाठी भैरवनाथ पेट्रोलीयम सरकोली येथून कारखान्यासाठी पेट्रोल व डिझेल खरेदी करुन ८ लाख ३६ हजार ५३ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करीत रोपळे येथील विलास पाटील यांनी पंढरपूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यावर नुकतीच सुनावणी झाली असून प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश खरोसे यांनी पंढरपूर तालुका पोलिसांना सीआरपीसी 156/3 प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिला आहे.
यानुसार मंगळवारी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला भगिरथ भालके, बी पी कर्पे सह भैरवनाथ पेट्रोलपंपाचे मालक, व्यवस्थापक यांचेवर भादवि कलम १२० ब, ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७अ, ३४ सह गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


















