सोलापूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी निलंबित केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव यांना निलंबन काळात गडचिरोली जिल्हा परिषद मुख्यालय देण्यात आलं आहे. ज्या जिल्ह्यात निलंबन होते तेव्हा तोच जिल्हा मुख्यालय म्हणून राहतो मात्र जाधव यांना गडचिरोली जिल्हा देण्यात आला आहे. डॉ जाधव यांना थेट गडचिरोली का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून यामागे गोंधळ काय हेच समजेना झाल्याची चर्चा आहे.
नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची तडकाफडकी घोषणाही सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केली होती. यामुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली.
सोलापूर जिल्ह्यातील 22 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 68 उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बऱ्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही.
.jpeg)


















