सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे तातडीने सोलापुरातून बेंगलोरला रवाना झाले आहेत. दिल्लीवरून काँग्रेस हायकमांडने शिंदे यांच्यासाठी सोलापूरला स्पेशल चार्टर विमान पाठवले त्यातून ते बेंगलोरकडे जात आहेत. यावरून कर्नाटक राज्यात सत्ता स्थापनेत सुशीलकुमार शिंदे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
शनिवारी कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला. काँग्रेसने या ठिकाणी 224 पैकी तब्बल 136 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असल्याने आता सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष असून मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रविवारी सोलापुरातील शिंदे यांच्या सात रस्ता परिसरातील जनत्सवाल्य या निवासस्थानासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या सत्काराची ही गर्दी होती.
शहराध्यक्ष चेतन नरोटे, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी महापौर सुशीला आबुटे, माजी नगरसेविका फिरदास पाटील, माजी महापौर संजय हेमगड्डी, अंबादास करगुळे, वैष्णवी करगुळे, अनुराधा काटकर, प्रवीण निकाळजे, तोफिक हतुरे, युवराज जाधव, सुनील रसाळे, हेमा चिंचोळकर, वाहिद विजापुरे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जनत्सवाल्यसमोर होती.
दुपारच्या सुमारास आपले सोलापुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने सुशीलकुमार शिंदे यांना बेंगलोरकडे रवाना व्हावे लागले. याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता समजले की काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय सरचिटणीस के वेणुगोपाल यांना तातडीने सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांना बेंगलोरकडे बोलावले आहे. शिंदे यांना त्वरित बंगलोर कडे जाण्यासाठी पक्षाने खास चार्टर्ड विमान पाठवल्याची माहिती मिळाली. त्या विमानाने शिंदे हे बेंगलोर कडे रवाना होत आहेत.
कर्नाटक सत्ता स्थापनेसाठी शिंदे यांची ऑब्झर्वर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावणगिरी जिल्ह्यातील मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. त्यामध्ये आठ पैकी सात जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. यावरून सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे कर्नाटकातील सर्व नेत्यांशी संबंध पाहता त्यांचा कर्नाटक सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाचा रोल मानला जात आहे.




















