सोलापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी राज्यातील तब्बल 800 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हाने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, हवालदार हिंदूराव अंबादास पोळ,नवनीत घाळेप्पा नडगेरी, पोलीस नाईक अल्ताफ सय्यद, दीपक घाडगे, अभिजित कोष्टी यांच्यासह सीआयडी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धाराम गवळी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते हे सन्मान चिन्ह या पोलिस अधिकारी यांना प्रदान करण्यात येईल.
दरम्यान महासंचालक सेठ यांनी आपल्या पत्रात,महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक/ पोलीस पदक व पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोधचिन्ह सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरीता दिलेल्या मंजूरीनूसार सन २०२१ या वर्षाकरीता शासन निर्णय दि. २९/४/२०१६ मधील नमूद प्रवर्गामध्ये परिशिष्ट अ” मध्ये निर्देशित केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे मी प्रदान करीत आहे. पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान झालेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचे मी अभिनंदन करून शुभेच्छा देतो.


















