सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
विशेषतः प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामकाज विरोधात तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. प्रहार संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी व कामगार युनियनने काही कर्मचाऱ्यांची नावे टाकून कारवाई करण्याची मागणी केली आहे. माध्यमांमधून याच्या वारंवार बातम्या येत आहेत.
दरम्यान बुधवारी जिल्हा परिषदेतील पत्रकारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. याविषयी चर्चा झाली. आपण काय भूमिका घेणार असे विचारले असता आताच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी माझी भेट घेतली. ज्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी व कामकाज बद्दल हरकती आहेत त्या मागवून घेतल्या आहेत.
अशांची यादी काढून बदमाश व दोषींवर कारवाई करणार असल्याचा इशारा स्वामी यांनी दिला आहे. लोहार प्रकरणानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन टेन्शनमध्ये असून मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी कारवाईचा हातोडा उचलणे गरजेचे बनले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.



















