सोलापूर : वसंतराव नाईक विकास आर्थिक महामंडळा कडून अडीच कोटी व चामडा व्यापाऱ्याकडून व्यवसायासाठी लोन स्वरूपात दहा ते बारा कोटी मिळवून देतो म्हणून वारंवार पैसे घेऊन सुमारे एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी एका मयत इसमासह तिघांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
रविराज सुर्यकांत कदम, वय ३८ वर्षे, व्यवसाय- जेसीबी मशीन भाडयाने देणे, रा. मु.पो. देगाव, ता. उत्तर सोलापूर,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बजरंग ऊर्फ दिपक बन्सीसिंग लंगडेवाले (मयत), रा. कुमठा नाका, सोलापूर, २) जितेंद्र बंसी नाईकवाडे, ३) सुजित नाईकवाडे, दोघे रा. कुमठे गाव, ता. उत्तर सोलापूर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या आरोपीतांनी संगनमत करुन, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास आर्थिक महामंडळ कडून अडीच कोटी रुपये व नमुद चमडा व्यापारी यांचे कडून उदयोग धंदयासाठी लोनच्या स्वरुपात दहा ते बारा करोड रुपये मिळवून देतो म्हणून फिर्यादी कडुन १९,५०,००० रुपये व फिर्यादीचा भाऊ विजय कदम यांचे कडुन दहा करोड रुपये नमुद प्रमाणे लोन देण्यासाठी १५,१०,००० रुपये तसेच फिर्यादीचा मित्र गणेश होटकर यास साडेतीन कोटीचे लोन मिळवून देतो असे सांगुन ३,५०,००० रुपये घेवून फिर्यादी, फिर्यादीचा भाऊ विजय व मित्र गणेश यांची फसवणुक केली आहे. तसेच फिर्यादीस तुम्ही आमचे विरुध्द कोठे तक्रार केल्यास तुमच्या विरुध्द अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे पोलीस स्टेशनला तक्रार देतो अशी धमकी यातील आरोपीत क्रं. २ व ३ यांनी दिली आहे. तसेच फिर्यादी प्रमाणेच आणखीन इतर लोकांकडुन देखील रक्कम घेवून एकुण १,०६,९५,००० रुपये इतकी रक्कम यातील वरील आरोपीतांनी स्विकारुन त्यांची देखील फसवणुक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंद्रूपकर हे करीत आहेत.
















