सोलापूर : युवक पँथरचे जिल्हाध्यक्ष दीपक गवळी यांना मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेलेले यु एन बेरिया यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात भादविक 323, 504,506 व 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी दिपक गवळी यांच्या आईचे खाते सोशल बँकेमध्ये असून ते ब्लॉक करण्यात आले आहे ते सुरू करावे म्हणून गवळी हे 10 मे 2022 रोजी दुपारी साडे अकराच्या सुमारास आपली आई नागुबाई गवळी, कर्जदार विजूबाई गायकवाड व मित्र महेश कंपली यांच्या सोबत लष्कर परिसरातील एरिया हॉल याठिकाणी गेले होते.त्यावेळी यु एन बेरिया हे अंगावर धावून गेले, तुमचे कर्ज माफ करण्यासाठी आमची बँक उघडली आहे का? इथुन जातो का नाही मला शहाणपणा शिकवतो का? असे म्हणून पायातील बुटासह पोटात लाथ मारली तसेच तसेच कार्यालयातील इतर दोन अनोळखी व्यक्तींनीही मारहाण केली.
कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर बेरिया यांनी मी सोलापूर महानगरपालिकेतील उच्चपद व राजकारणातील मोठे पदे भोगले आहेत, आमच्या घरातील सर्व वकील आहेत, तुझ्यावर दरोडा व खंडणीचा गुन्हा दाखल करतो, कायद्याचा कसा वापर करायचा आहे हे आम्हाला माहिती आहे असे म्हणून तू इथून नाही गेला तर कार्यालयात तुला कोंडून ठेवीन परत येथे आला तर तुला जिवंत सोडणार नाही, तुझ्या आईला देखील काम करू देणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक वाडीकर हे करत आहेत.


















