सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावच्या शिवारातील दोन वस्तीवर धाडसी दरोडा पडला या दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाला बोलावून तपासाचे काम सुरू करण्यात आले आहे. बाबू कल्लाप्पा हिरजे असे दरोडेखोरांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.
मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास पाच दरोडेखोर बोरामणीत आले. सुरवातीला बाबू हिरजे यांच्या घरी दरोडा टाकला. बाबू हिरजे व त्यांची पत्नी गाढ झोपेत होते. दरोडेखोरांनी पत्नीला चाकूचा धार दाखवून त्यांच्या गळ्यातील व कानातील दिड तोळाचे सोने हिसकावून घेतले. दरोडेखोरांना प्रतिकार करणारे बाबू हिरजे यांच्या डोक्यात दरोडेखोरांनी कु-र्हाडीसारख्या हत्याराने वार केला. रक्त्याच्या थराळ्यात पडलेल्या बाबू हिरडेंचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोर पाटील यांच्या घरांपर्यंत पोहोचले.
पाटील हे जागे झाल्याने त्या ठिकाणी दरोडे टाकण्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांच्या झालेल्या झटापटीत पाटील यांच्या हाताला चाकू लागला. पाटील हे मोठमोठ्यांने आवाज केल्याने दरोडेखोर तिथून पळून गेले अशी माहिती मिळत आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली यावेळी वस्तीवरील पत्र्याच्या शेडमध्ये हिरजे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या भागातील पंचायत समितीचे सदस्य धनेश आचलारे यांनी याठिकाणी जाऊन पोलिसांना सहकार्य केले.

















