सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावच्या सरपंच शांताबाई नारायण व्हटकर यांना सरपंच पदावरून काढून टाकण्यात आले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही कारवाई केली. सरपंच पदाचा तात्पुरता चार्ज उपसरपंच यांच्याकडे देण्यात आला आहे.
सरपंच शांताबाई व्हटकर यांच्या विरोधात ग्रामस्थ बाळासाहेब ईश्वर नवगिरे व सैफन हाजीमलंग शेख यांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी गंभीर अपहार स्वरूपाच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. यावर गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्या अहवालानुसार धोत्रीचे ग्रामसेवक आय बी भोज यांना निलंबित करण्यात आले होते. आणि सरपंचावर कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
विभागीय आयुक्त राव यांच्याकडे सुनावणी होऊन सर्व अहवाल पाहता सरपंच व्हटकर यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांची सरपंच पदावरून हकालपट्टी केल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी काढला.
नेमकी तक्रार काय होती पहा
धोत्री येथील १) मातंग वस्ती समाज मंदिर बांधकाम, २) आंबेडकर वस्ती शाळा वॉल कंपाऊंड करणे, ३) आंबेडकर वस्ती शाळामध्ये बोअर मारणे, ४) मातंग वस्ती मध्ये बंदिस्त गटार करणे, ५) भिमनगर मधील 8) समाज मंदिर दुरुस्ती, ६) ढोर गल्ली मध्ये बंदिस्त गटार, ७) जलजन्य योजने अंतर्गत गांव अंतर्गत नळ कनेक्शन जोडणी, ८) भिमनगर मधील पिण्याच्या पाण्याचे विहिर दुरुस्ती व खोलीकरण, ९) अपंग निधी, १०) महिला बाल कल्याण निधी असलेली सर्व कामे १४वा व १५वा वित्त आयोगामधुन मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु नमूद कोणतीही कामे न करता ग्रामसेवक आय.बी. भोज व सरपंच शांताबाई नारायण व्हटकर यांचा पुत्र प्रभाकर नारायण व्हटकर यांच्या दोघांच्या संगनमताने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे.
तसेच आय.बी. भोज व सरपंच श्रीमती. शांताबाई नारायण व्हटकर या दोघांनी संगनमत करुन पदाचा गैरवापकरुन लाखो रुपयांचे चेक दिलेले आहेत. आय.बी. भोज व सरपंच श्रीमती. शांताबाई नारायण व्हटकर या दोघांनी संगनमत करुन पदाचा गैरवापर करुन वरीलप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच मुलगा, सरपंच मुलगा याचा सहकारी व रोजगार सेवक यांच्या नावाने बेकायदेशीर धनादेश काढून लाखो रुपयाचा मोठा गैरव्यवहार व भ्रष्टाचार केले आहे. याबाबत आपण आपल्या स्तरावरुन चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचारा झाल्याचे निदर्शनास / उघडकीस येईल.
तसेच वरील सर्व कामे बांधकाम व पाणी पुवठयाचे खात्याचे जी.ए. श्री. बिराजदार यांनी कोणत्याही कामाचे एम.बी. केलेली नसताना बोगस कामे दाखवून बिले काढलेली आहेत. वरील सर्व कामांची वरील नमूद व्यक्तीच्या नावाने सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमतानी लाखो रुपयाचे चेक काढलेले होते.



















