सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 77 व पंचायत समितीच्या 154 जागांसाठी 2 जून रोजी प्रारूप प्रभाग रचना नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. या प्रभाग रचनेवर 8 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या. शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवार 8 जून रोजी 60 हरकती प्राप्त झाल्या आहेत.
एकूण 95 हरकती प्राप्त झाल्या असून सर्वाधिक हरकती या अक्कलकोट तालुक्यातून आल्या आहेत तर उत्तर सोलापूर तालुक्यातून एकही हरकत आली नाही. जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राप्त हरकती पुढील प्रमाणे आहेत
अक्कलकोट 17, बार्शी 6, मोहोळ 11 , दक्षिण सोलापूर 9, सांगोला 11, पंढरपूर 15 , मंगळवेढा 8, माळशिरस 2, उत्तर सोलापूर 0, करमाळा 8, माढा 7
अशा हरकती असून या सर्वांच्या हरकतींवर येत्या 15 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी होणार आहे. जिल्हा परिषद मतदार संघावर हरकत घेणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, विलास गव्हाणे, काँग्रेसचे दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील, इंद्रजीत लांडगे, अतुल गायकवाड, माळशिरस तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे अशा काही नेत्यांच्या नावाचा हरकती मध्ये समावेश आहे.
प्रामुख्याने हरकतींमध्ये प्रभागातून वगळण्यात आलेली गावे पुन्हा समाविष्ट करावीत अशा हरकतींचा समावेश आहे.