भारतीय जनता पार्टी पुरस्कृत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे सोमवारी जिल्हा परिषदेत आले होते त्यांनी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या कार्यालयास भेट दिली, त्या ठिकाणी चहा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, माजी सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्यासह आमदार राऊत यांचे काही सहकारी उपस्थित होते. यावेळी राजा राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहता जिल्हा परिषद सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे असे बोलून दाखवले, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसेच पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये सहा महिने मुदतवाढीची मागणी करणारा ठराव करा आणि तो ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठवा अशा सूचना आमदार राऊत यांनी केल्या. तसेच पालकमंत्र्यांच्या सुमारे शंभर ते दीडशे अधिकाऱ्यांसोबत बैठका होतात तर जिल्हा परिषदेच्या 68 सदस्य आणि 25 अधिकाऱ्यांची बैठक का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत नियोजन भवनामध्ये जिल्हा परिषदेची सभा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करा अशीही सूचना राऊत यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेवर लक्ष ठेवण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या दोन्ही आमदारांनी प्रत्येक सोमवारी वेळ मिळेल तसे चक्कर मारायची असे ठरले होते मात्र पहिल्या सोमवारी एकही आमदार झेडपी कडे फिरकला नाही तो विषय झेडपीच्या परिसरात चर्चेचा झाला होता, याच योगायोगाने सोमवारी आमदार राजेंद्र राऊत झेडपीत आले याप्रकरणी त्यांना विचारले असता हा केवळ योग आहे मी एका महत्त्वाच्या बैठकीसाठी प्रांत अधिकाऱ्यांकडे आलो होतो त्यानिमित्ताने चहा घेण्यासाठी विजयराज डोंगरे यांच्या कार्यालयात आल्याचं सांगितलं.


















