सोलापूर : प्रभारी आणि वादग्रस्त असलेल्या गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे मुळेच जिल्हा परिषदेत झाले अनेकांचे वांदे या सिंहासन च्या बातमीनंतर जिल्हा परिषदेत अशोक भांजे यांच्या आता अनेक प्रकरणांची चर्चा सुरू झाली आहे. अशोक भांजे हे प्रभारी असून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कारभारी झाल्याचं चित्र आहे.
माध्यमिक शिक्षण विभागात अशोक भांजे हे मागील तब्बल 11 वर्षांपासून एकाच टेबलावर म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून चिकटले आहेत. सध्या त्यांच्याकडे अक्कलकोट तालुक्याचा गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. तसेच भांजे यांच्याकडेच माध्यमिक शिक्षण विभागातील स्वयंअर्थसहाय्य शाळा सेल्फ शाळा फायनान्स या टेबलाचा चार्ज आहे.
अक्कलकोट तालुक्यात भांजे हे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात 15 दिवसांत केवळ एक दिवस जाऊन कामकाज पहात असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक हे भांजे यांना व्यवस्थित ऍडजस्ट असल्याची चर्चा आहे.
तीन-चार प्रभार पाहून एवढ्यावरच भांजे यांचे भागले नाही तर झेडपीतील काही लोकांनी अशी माहिती दिली की, अपूर्वा ज्ञानपीठ सोलापूर या मोठ्या संस्थेच्या अंतर्गत त्यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज गावी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि कॉलेज आहे. तसेच अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे इंग्लिश मीडियम स्कूल प्राथमिक शाळा आहे. सोलापूर शहर परिसरात एक प्राथमिक शाळा आहे.
उमरगा तालुक्यातील सुपतगाव या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे. घोळसगाव या ठिकाणी शंभू महादेव प्रशाला या नावाने मराठी व कन्नड शाळा आठवी ते दहावीपर्यंतचे आहे. इकडे एवढ्या शाळांचा कारभार जर स्वतःच्या मालकीचा असेल तर ते शासनाच्या शाळा पट वाढ तसेच शिक्षण विभागाच्या उन्नतीसाठी किती लक्ष असणार हा सुद्धा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

















