सोलापूर : माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांचे शहरात सध्या लक्ष कमी दिसत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यात ते दिसत नाहीत, बैठकीला येत नाहीत, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारली. सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने दोन उड्डाणपूल तसेच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असलेली समांतर जलवाहिनी या कामाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
त्यामुळे शहर विकासाचे विविध प्रश्न असतील सरकार आणि प्रशासनात त्यासाठी समन्वय साधणारा कोणीतरी असावा म्हणून पालकमंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या पद झालेल्या बैठकीत तशी मागणी पुढे आली.
पालकमंत्री विखे पाटील यांनी समन्वयक म्हणून ही जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या खांद्यावर दिली आहे. रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री हे कार्यक्रमासाठी बाहेर पडत होते तेव्हा त्यांच्यासमोर शहराध्यक्ष देशमुख, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त शितल उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी शहराध्यक्ष देशमुख यांना आता तुमच्यावर मी जबाबदारी दिली आहे, व्यवस्थित समन्वय साधा, देशमुख यांना सहकार्य करण्यासाठी त्यांनी उपस्थित समोरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच यामध्ये आमदार सुभाष देशमुख यांचे सहकार्य घ्यावे अशीही सूचना शहराध्यक्ष देशमुख यांनी केली.

















