सोलापूर : जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापूर दौरा निश्चित झाला आहे. सोलापुरात रविवारी ते मुक्कामी येणार असून सोमवारी दिवसभर ते प्रशासकीय आढावा घेणार आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर ते सोलापूर दौरा कधी करणार याकडे राजकीय आणि प्रशासकीय नजरा लागल्या होत्या शेवटी आता त्यांचा दौरा निश्चित झाला आहे.
बुधवारी पालकमंत्र्यांचे ओएसडी बाळासाहेब यादव हे सोलापुरात असून त्यांनी शासकीय विश्रामगृह त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवन मध्ये भेटी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या व्हीआयपी कक्षाची पाहणी यादव यांनी केली.
पालकमंत्र्यांच्यासाठी असलेल्या कक्षाची ही पाहणी करत नियोजन भवनातील मुख्यमंत्री सचिवालयाच्या शेजारी असलेल्या कार्यालयातील कामकाजाबाबत ही चर्चा झाली. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, मोहन डांगरे, कार्यकारी अभियंता गावडे, जिल्हा नियोजन अधिकारी पवार उपस्थित होते.