सोलापूर : भाजपचे महाराष्ट्रात 200 आमदारांचे टार्गेट असल्याने ‘मिशन महाविजय’ साठी आमदार श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा दौराही झाला. मोहोळ आणि माढा या दोन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची नजर आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांचेही भाजप प्रवेशाचे जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या दौऱ्यानंतर आता मालकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अधिकच वाढली आहे. राजन मालकांशी समन्वय साधून काम करणारे आणि कौटुंबिक संबंध असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे सुद्धा आता वयोमानानुसार जिल्हाध्यक्ष पद सोडण्याच्या तयारीत दिसून येत आहेत.
गुरुवारी पत्रकारांनी काका साठे यांच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या ते म्हणाले, राजन पाटील यांची इच्छा नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची मात्र परिस्थितीच तशी होऊन बसली आहे यामध्ये मी तरी काय करणार.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीबाबत आणि जिल्हाध्यक्ष पद सोडण्याच्या चर्चेबाबत विचारले असता साहेबांची अजून भेट झालेली नाही. येत्या काही दिवसात भेट होईल या भेटीत काय चर्चा होते त्यानंतर पत्रकारांना सविस्तर सांगेन असे उत्तर त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या कारभारावर भाष्य करताना असला प्रशासकीय कारभार नको रे बाबा ! म्हणून त्यांनी पत्रकारांसमोरच हात जोडले.


















