पंढरपूर : पंढरपूर पोलीस व वनविभागास 8 लाखांचे चंदन पकडण्यात यश आले आहे. यात दोन आरोपींना अटक केली आहे.
सुगंधी चंदनाची ओली लाकडे कारमधून वाहतूक करणार्या दोघांवर पंढरपूर तालुका पोलिस व वनविभागाने मंगळवारी रात्री (ता. 8) कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी 132 किलो 900 ग्रॅम सुगंधी चंदन व कार असा एकूण 12 लाख 97 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वनपाल एस.एस.पतकी, वनरक्षक एस.डी.कांबळे यांनी सर्व मालाची पाहणी करुन पंचनामा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर – मोहोळ रोडवरील तीन रस्ता याठिकाणी वाहन तपासणीदरम्यान सिल्व्हर रंगाची इर्टीका कार (एम.एच 42 के 7611) मध्ये पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे आढळून आली. यामध्ये एकूण चार नायलनच्या पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची ओली लाकडे 132 किलो 900 ग्रॅम (एकुण किंमत 7 लाख 97 हजार 400 रुपये) व एक सिल्व्हर रंगाची एरटिका कार 5 लाख) असा एकूण 12 लाख 97 हजार 400 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये चालक रमेश महादेव तेलंग (वय 25 वर्षे रा.तुंगत ता.पंढरपूर जि.सोलापूर), कचरुद्दीन अल्लामीन जमादार (वय 35 वर्षे, रा.पेनुर ता.मोहोळ जि.सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. या दोघंवर भादवि कलम 379, 34 सह भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 42, 66, 66 (अ) व महाराष्ट्र नियमावली 2014 नियम 82 व महाराष्ट्र अधिनियम कलम 29 प्रमाणे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
















