सोलापूर : सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे.ही घटना 30 मे रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पण या मागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. याची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस तपास सुरू आहे.
एकाच साडीने घेतला आई व मुलाने गळफास-
उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक (वय 62 वर्ष,रा शिवगंगा नगर,शेळगी ,सोलापूर),दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक(वय 42 वर्ष,रा,शिवगंगा नगर,शेळगी सोलापूर) असे मृत आई व मुलाचे नाव आहे.राहत्या घरी अज्ञात कारणावरून या दोघांनी 30 मे 2022 रोजी एकाच साडीने गळफास घेतला. सकाळपासून घरात सामसूम दिसत असल्याने ,आजूबाजूच्या नागरिकांनी आत डोकावून पाहिले. दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे.


















