मोहोळ : कपडे धुण्यासाठी ओढयावर गेलेल्या ऊस तोड मजूरांची दोन मुली व एका पाच वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ४ मार्च रोजी घडली.यातील अजय जाधव याचा मृतदेह ५ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान हाती लागला.
याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील ऊसतोड कामगार मोहोळ तालुक्यात तोडणीसाठी आले आहेत. या कामगारांपैकी हिरामण रंगनाथ गायकवाड रा. तडपांगरी ता. जि. परभणी, अंकुश जाधव व बाळू जाधव रा. बोरवंड खुर्द, ता. जि. परभणी हे देखील आपल्या कुटुंबासमवेत मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे ऊस तोडणीसाठी आले आहेत.
वरील तिघा जणांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ऊस तोडणीसाठी फडात गेले होते. त्यादरम्यान त्यांच्या कोपीवर सुरेखा हिरामण गायकवाड, रेणुका अंकुश जाधव व अजय बाळू जाधव असे तिघेजण थांबले होते. सायंकाळी ६ वाजता ऊसतोडी करून सर्वजण कोपीजवळ आले असता, त्यांना सुरेखा, रेणुका व अजय असे तिघेजण दिसले नाहीत आजूबाजूला शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाहीत.
म्हणून सर्वजण थोड्या अंतरावर असलेल्या एका ओढ्याजवळ गेले असता त्यांना पाण्यावर ओढणी तरंगताना दिसली त्यावरून तिघेजण पाण्यात पडल्याचा संशय बळावला व ग्रामस्थ पोलिस प्रशासनाच्या मदतीने रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान सुरेखा व रेणुका या दोघींचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढण्यात आला. शोध घेऊनही अजय चा मृतदेह सापडत नसल्याने तसेच अंधाराचा अडथळा होत असल्याने सुरेखा व रेणुका या दोघींचे शव घेऊन त्यांचे वडील मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री १२ च्या दरम्यान दाखल झाले.
तर दि. ५ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ५ वर्षीय अजय जाधव याचा मृतदेह हाती लागला. या घटनेप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात वरील तिन्ही मुलांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.
















