सोलापूर : 8 मार्च जागतिक महिला दिन सोलापूर सह परिसरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर महापालिका, पोलीस प्रशासन असे सर्वत्र महिला दिन साजरा केला गेला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात या दिनाचा उत्साह दिसून आला नाही. हे या दिवसाचे दुर्दैव होते.
सोलापूर जिल्हा प्रशासनामध्ये यावेळेस महिला अधिकाऱ्यांचे संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये आयएएस तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, भूसंपादन अधिकारी अरुणा गायकवाड, रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, सामान्य प्रशासन तहसीलदार अंजली कुलकर्णी, संजय गांधी निराधार योजना तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी वर्मा, विशेष म्हणजे जिल्ह्याच्या माहिती अधिकारी संप्रदा बिडकर इतक्या महिला प्रमुख अधिकारी तसेच शेकडो महिला कर्मचारी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला दिनाचा कोणताही कार्यक्रम झाल्याचे पाहायला मिळाले नाही.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे प्रकृती अस्वस्थामुळे ते निवासस्थानी थांबून काम पाहत आहेत. मात्र अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्यासह अनेक इतर अधिकारी असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम करता आला असता परंतु तसे झाले नाही. जिल्हा माहिती अधिकारी बिडकर यांनीही महिला दिनाचा कार्यक्रम करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते.


















