सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारोपाच्या मिरवणुकीत रविवारी विजेच्या धक्क्याने एका २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दिनांक 17 रोजी रात्री अकराच्या दरम्यान महापौर बंगल्या जवळ हा प्रकार घडला. रात्री उशीरापर्यंत त्या तरुणाचे नाव कळू शकले नव्हते. विजेचा धक्का बसल्यानंतर मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले.
उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हा प्रकार नेमका कसा घडला? याची चौकशी सुरू होती. सोमवारी त्याचे नाव निष्पन्न झाले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तपासामध्ये घटनेचे कारण स्पष्ट होईल, असे सदर बझारच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले होते.
युवकाची आज ओळख पटली आहे. शेळगी येथे राहणार युवक सूर्यकांत चंद्रकांत निम्बर्गी असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आज समोर आले आहे. युवकाचे नातेवाईक हे आज दुपारी सदर बाजार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे.

















