बार्शी : छत्तीसगड येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे जवान रामेश्वर वैजिनाथ काकडे हे शहीद झाले. बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील शेतकरी कुटुंबातील रामेश्वर काकडे होते त्यांच्या पश्चात आई वडील, बहीण, पत्नी आणि केवळ दोन महिन्याचे बाळ असा परिवार आहे.
गरीब परिस्थितीवर मात करून आपल्या कष्टाच्या जोरावर आर्मीत भरती झालेला हा शेतकरी सुपूत्र आज भारत मातेच्या चरणी शहीद झाला. सोलापूर जिल्ह्या व बार्शी तालुक्यातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
दरम्यान याबाबतची माहिती बुधवारी रात्री उशिरा काकडे कुटुंबियांना सैन्य दला मार्फत देण्यात आली आज गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास शहीद जवान रामेश्वर काकडे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहीद जवान रामेश्वर काकडे हे २०१२ साली जम्मू काश्मीरमध्ये सैन्यदलात रुजू झाले होते, त्यानंतर त्यांनी विविध राज्यातील बॉर्डरवर आपली सेवा बजावली होती. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते, बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.

















