सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते दिलीप माने, ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्या सहकार्याने सर्वसाधारण जागेवर सभापती म्हणून बसण्याचा मान मिळाला. ज्येष्ठ नेते काका साठे यांनी कामकाजात मोलाचे सहकार्य केले, दोन वर्षे सभापती पदाच्या कामावर समाधानी असून तालुक्यात कोरोनाच्या कठीण काळातही 29 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करत विकास कामे केली. कामकाज करताना त्रास झाला, अविश्वास ठराव आला, मात्र ती विरोधकांची स्टंटबाजी होती. त्यांना आमचे नेते शेवटी भारीच पडले. यापुढील राजकारण दिलीप माने यांच्याच नेतृत्वाखाली करणार अशी भूमिका उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांनी दिली.
सभापती रजनी भडकुंबे यांच्या सभापती कारकिर्दीला 31 डिसेंबर रोजी 2 वर्ष पूर्ण झाली, त्याप्रित्यर्थ त्यांनी पंचायत समिती मध्ये पत्रकार परिषद घेतली, यावेळी दोन वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा माध्यमासमोर मांडला.
सन 2019-2021
लसीकरण – पहिला डोस 85%, दूसरा डोस 42% नागरीकांना.
बांधकाम विभागाअंतर्गत – 6.87 कोटीचा निधी.
ग्रामीण पाणी पुरवठा – 7.42 कोटीचा निधी.
लघू पाटबंधारे (जि.प. स्तर) – 0.93 कोटीचा निधी.
अहिल्या सिंचन विहीरी 113, घरकूल 317 व्यक्तीना लाभ, 161 कुंटूबास वैयक्तीक शौचालय.
दलित वस्ती 1.66, रस्ते विकास 1.03, 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत 6.87 कोटीचा निधी.
अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकयांना 6.21 तर अवर्षणग्रस्त खरीप पिक नुकसान भरपाई पोटी 2.50 कोटीचा निधी प्राप्त.
सभापती रजनी भडकुंबे या 2017 साली भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीतून त्या भारतीय जनता पक्षाकडून निवडून आल्या, त्या लगेच उपसभापती झाल्या, अडीच वर्षांनी सभापती पद हे सर्वसाधारण झाले, त्यावेळी मात्र भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बिनसले, भडकुंबे या माने गटासोबत जाऊन बिनविरोध सभापती झाल्या होत्या. एक वर्षानंतर सभापती पद देण्यावरून बिनसले. माने गटाचा एक सदस्य फुटून राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीच्या सदस्याला मिळाला या तिघांनी एकत्र येत सभापती भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव आणला मात्र या ठरावाला उच्च न्यायालयातून सध्या स्टे आहे.


















