शनिवारी उजनी समांतर जलवाहिनीच्या जॅकवेल पाहणीचा दिवस होता, महापालिकेचे सभागृहनेता सोडले तर सर्व पदाधिकारी उपस्थित होते,
महापौर श्रीकांचना यंनम, विरोधी पक्षनेते अमोल बापू, गटनेते रियाज खरादी, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक नागेश भोगडे, ही नेतेमंडळी उपस्थित होती, जॅकवेल जागा पाहणी झाली, त्यानंतर उजनीच्या रेस्ट हाऊसमध्ये जेवण झाले, पण दौऱ्यात काँग्रेसच्या चेतन नरोटे यांच्या चेहऱ्यावर कॉंग्रेस भवनातील साहेबांच्या पोस्टरवर शाई फेकल्याच्या प्रकारामुळे उत्साह दिसला नाही, आनंद दादा तर कायम उत्साही माणूस पण त्यांचा मूड का नव्हता हेच कुणाला समजले नाही. जेवण संपून बाईट झाल्याबरोबर नरोटे चंदनशिवे तिथून गायब झाले. किसन भाऊ जाधव मात्र निवांत आपली लुंगी सांभाळत गाडीत बसून सर्वांसोबत निघून गेले, महापौर, विरोधी पक्षनेते, महापालिका आयुक्त हेच पत्रकारांसोबत दिसून आले नंतर चंदनशिवे, नरोटे, किसन जाधव कुठे गेले हेच कळलं नाही. काही वेळाने मात्र आनंद दादा टेम्भुर्णी जवळ निमगावात आपले आमदार संजयमामा शिंदे यांच्या कडे गेले, तिथे संतोष भाऊ होतेच.ठरल्याप्रमाणे दादांनी आपले मामांसोबतचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. दादांचं ठरलंय केवळ प्रवेश बाकी आहे तो कधी होतोय याचीच वाट अनेकजण पाहत आहेत.
दुसरीकडे किसन भाऊ जवळ असलेल्या इंदापूरच्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामांकडे पळाले.तिथे मामांची भेट घेतली, उजनीच्या समांतर जलवाहिनीची माहिती दिली. त्यांच्या सोबत चर्चा करत असलेले फोटो त्यांनीही मीडियावर व्हायरल केले. राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन्हीही मामा अजित दादांच्या जवळचे. पालकमंत्री म्हणून भरणे मामांचे प्रशासनावर वर्चस्व मात्र स्थानिक राजकारण, संघटन बांधणीत, कुणाला कुठं ठेवायचं यात संजयमामा चांगलेच माहीर आहेत. त्यामुळेच चंदनशिवे यांनी भविष्यातील गरज ओळखून मामांची भेट घेतली असावी.



















