सोलापूर : शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षातच कोसळले. 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. मात्र भारतीय जनता पार्टीने खेळी करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
रविवारी विधानभवनात विशेष अधिवेशन घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष पदाची निवड झाली राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार विधानसभेचे अध्यक्ष झाले. या मतदानावेळी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे भाजप शिवसेना युती सोबत ठाम राहिले. त्यांनी नार्वेकरांना मतदान केले यावरून राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनिष्ठपणा दिसून आला.
सर्वांचे लक्ष लागले होते ते करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या भूमिकेकडे. मात्र या निवडणुकीत अपक्ष आमदार संजयमामा शिंदे हे महाविकास आघाडी सरकारसोबत राहिले. त्यांनी शिवसेनेच्या राजन साळवी यांना आपले मतदान केले. जेव्हा 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी संजय शिंदे हे करमाळ्यातून अपक्ष निवडून आले. त्यांनी त्याचवेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा राहील असे सांगितले. परंतु नंतर तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हा संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडी सोबत राहणे पसंत केले.
आताही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला होती परंतु, भाजपने एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केले. त्यामुळे संजयमामा शिंदे यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते तर निश्चितच संजयमामा यांचे मत भाजप सेनेच्या युतीक्या बाजूने झाले असते मात्र अजितदादा पवार यांची साथ संजयमामा यांनी सोडली नसल्याचे पाहायला मिळाले. दादानिष्ठ संजयमामा या निवडीत दिसून आले.

















