सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथल्या प्रस्तावित एमआयडीसीला काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला असून सातबाराच्या वरील एमआयडीसी नोंद हटवावी यासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या आमसभेत मंद्रुप एमआयडीसीचा विषय पुढे आला.
मंद्रुपचे भाजप कार्यकर्ते गौरीशंकर मेंडगुडले आणि युवा नेते यतीन शहा यांनी एमआयडीसीचा विषय लावून धरला. सुरुवातीला मेंडगुडले यांनी मंद्रूप गावातील शेतकऱ्यांनी एमआयडीसीला विरोध केला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, ज्यांना शेती द्यायची नाही त्या शेतकऱ्यांच्या जमिनी वगळून मंद्रूप ला एमआयडीसी व्हावी असा ठराव करावा अशी मागणी केली.

















