मंद्रुप :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील समाजसेवक वेदमूर्ती शिवानंद हिरेमठ – स्वामी यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम राम ठोकून आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष बिपीन करजोळे यांनी पक्षाचे उपरणे घालून हिरेमठ यांना पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.
गेल्या ५० वर्षांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शिवानंद हिरेमठ हे कै.गोपाळराव कोरे यांचे खंदे समर्थक आहेत.अलिकडच्या काळात मंद्रुपचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून भारतीय जनता पक्षात ते कार्यरत होते.मात्र भाजपकडून मंद्रुप भागाच्या विकासाचा भ्रमनिरास झाल्याने राष्ट्रवादीचे जिल्हा खजिनदार व प्रवक्ते डाॅ.बसवराज बगले यांच्या पुढाकारातून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्धार केला.
जंगम समाजाचे नेते आणि महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष शिवानंद स्वामी यांनी स्थानिक पातळीवर कोरे बंधूंसोबत चर्चा करून मंद्रुपच्या विकासासाठी यापुढील काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण काम करू अशी ग्वाही दिली.
हिरेमठ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीतील कै.गोपाळराव कोरे यांची पोकळी भरून निघेल असा विश्वास व्यक्त करून डाॅ.बगले यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.त्यांच्या प्रवेशामुळे मंद्रुपच्या भाजपाला भगदाड पडले आहे.यापुढे लवकरच अन्य प्रमुख मंडळी राष्ट्रवादीत दाखल होतील असेही संकेत यावेळी त्यांनी दिले.
त्यांच्या समवेत बाबूराव वाडकर आणि उमर काझी हे सुध्दा स्वगृही राष्ट्रवादीत दाखल झाले.त्यांचेही यावेळी जिल्हाध्यक्ष साठे यांनी स्वागत केले.दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपण बळ तसेच सन्मान देऊ अशी ग्वाही साठे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी माजी सभापती व राष्ट्रवादीचे सरचिटणीस आप्पाराव कोरे,माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील,दक्षिण सोलापूरचे विधानसभा अध्यक्ष मुजीब शेख, ज्येष्ठ नेते सुभाष पवार,नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे,राष्ट्रवादी युवती अध्यक्ष दिलखुष तांबोळी,तुळजाराम नरोटे,शिवराज जाधव, अर्जुन वाघमारे,महादेव जकुणे,महादेव शिंगाडे,इमरान मुजावर आदि उपस्थित होते.


















