सोलापूर : उमेद अभियानाच्या वतीने रुक्मिणी दिवाळी महोत्सवाअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये 27 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील महिला स्वयसहाय्यता समूहाद्वारे निर्मित खाद्य पदार्थ व इतर दिवाळी साहित्य प्रदर्शन विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रकल्प संचालक संतोष धोत्रे, आनंद तानवडे, अण्णाराव बाराचारे, अमर पाटील, जिल्हा व्यवस्थापक मीनाक्षी मडीवळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सीईओ स्वामी यांनी आता सर्वांनी काही तरी आपल्या पैशांनी खरेदी करण्याच्या सूचना केल्या तेव्हा लगेच अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी पणत्या खरेदी केल्या, आनंद तानवडे यांनी पाणीपुरी घेतली ती पाणीपुरी अध्यक्ष कांबळे , अण्णाराव बाराचारे यांनी एकत्र खाल्ली. दिलीप स्वामी व संतोष धोत्रे यांनी टेराकोटा आर्ट ची वस्तू घेतली तसेच करंजी व शंकरपाळी खरेदी केली.
या प्रदर्शनात प्रत्येक तालुक्यातून एका महिला बचत गटाचा उपक्रम सहभागी करण्यात आला आहे. यात मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीच्या पणत्या, शेंगदाणा लाडू व चिक्की, रानमसलेची पाणीपुरी व पणत्या, सुस्तेचे तिळाचे लाडू, ज्वारीची चकली, चिवडा, बार्शी तालुक्यातील जहानपूरच्या बचत गटाची सोया चकली, खोबरा लाडू तर मानेगावचा टेरीकोटा आर्ट सहभागी करण्यात आल्याचे सांगितले. बचत गटाची उत्पादने ऑनलाइनवर उपलब्ध केली.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संतोष डोंबे, राहुल जाधव, भाग्यश्री लोंढे, प्रमोदिनी लांडगे, अपर्णा देशमुख हे प्रयत्न करीत आहेत.


















