सोलापूर : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठा समाजाचा पक्ष म्हणून ओळखला जातो, मराठा समाजाच्या नेत्यांचे या पक्षावर प्राबल्य आहे मात्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी इतर समाजाच्या नेत्यांना ही तितकेच मानाचे स्थान पक्षात दिले आहे. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमधून महेश कोठे, एमआयएम मधून तोफिक शेख, बहुजन समाज पार्टी मधून नगरसेवक आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
सोलापूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेचे नियोजन राष्ट्रवादीने आपल्या ताकतीवर केले आहे त्यामुळे हे तिन्ही नेते पक्षासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस सोडल्यानंतर महेश कोठे यांनी शिवसेनेत जाऊन आपली ताकद दाखवून दिली शिवसेनेचे पहिल्यांदाच 21 नगरसेवक निवडून आले, तोफिक शेख यांनी काँग्रेसला सोडल्यानंतर एमआयएम मध्ये नऊ नगरसेवक निवडून आणले, आनंद चंदनशिवे यांनी बसपाच्या हत्तीवर आपली घोडदौड चालू ठेवली सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांनी संख्याबळ वाढवल्याचे दिसून आलं, आता हे तीन नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत काही दिवसात त्यांचा प्रवेश ही होईल.
मात्र सोलापूर शहरांमधील मराठा समाजातील काही ज्येष्ठ नेते यांना विरोध करताना दिसत आहेत, शहरात मनोहर सपाटे, महेश गादेकर, दिलीप कोल्हे, संतोष पवार, पद्माकर काळे, राजन जाधव या मराठा समाजातील नेत्यांचे राष्ट्रवादी पक्षावर वर्चस्व आहे. मागील दीड- दोन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्याने तब्बल तेराशे हून अधिक नव्या पदाधिकार्यांच्या निवडी झाल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पक्षाचे नेते शरद पवार हे सोलापुरात येणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने जर सोलापूर शहरात पक्षाकडे नव्याने तेराशे सदस्य पदाधिकारी निवडी झाल्या असतील तर महापालिकेसाठी महेश कोठे, तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांची गरज नाही तेराशे नव्या पदाधिकाऱ्यांमधून 15 पदाधिकार्यांच्या मागे एक नगरसेवक अशी जबाबदारी दिली तर निश्चित राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोलापूर महापालिकेत सत्ता येईल असा अति आत्मविश्वास या नेत्याने व्यक्त केला असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सोलापूर दौर्यावर आल्यावर आपण त्यांच्यासमोर हा विषय मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


















