सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना सोलापूर जिल्ह्याच्या सर्वदूर आणि दुर्गम भागातील श्री शंभू महादेवाच्या डोंगरात लपलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारुंडे येथे भेट दिली. शाळा पाहून स्वामी अवाक झाले. कर्तव्यतत्पर शिक्षक, शाळा प्रेमाने एकरूप झालेले दानशूर ग्रामस्थ यांच्या भरीव योगदानातून अविश्वसनीय कायापालट झालेली दिमाखदार कारुंडे शाळा पाहून भारावलेल्या सीईओ स्वामी यांनी स्वतः सत्कार न स्वीकारता गावचे सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दानशूर पालक आणि कल्पक शिक्षकांचा सत्कार केला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणी शाळा भेट देण्याचा पायंडा मोडून स्वामी यांनी जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर होऊन दूर असलेल्या, शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत लपलेल्या कारुंडे शाळेस भेट दिली. सरहद्दीवरील शाळा सुद्धा फुलवू शकतात विकासातून बाग याचा अनुभव घेतला.
चार हजार लोकसंख्या असलेल्या कारुंडे वासियांनी शाळा हे गावाचे अपत्य आहे या उदात्त भावनेतून शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे साडेतेरा लाखाहून अधिक शैक्षणिक उठावासाठी योगदान देऊन इतिहास घडविला. शिक्षक आणि ग्रामस्थांच्या योगदानाला स्वामींनी सलाम केला. शिक्षकांच्या विधायक भूमिकेमुळे गाव एक होऊ शकते याची प्रचिती आल्याचे कौतुकोद्गार काढले.
स्वच्छ शाळा सुंदर शाळा या महत्वकांक्षी मोहिमेअंतर्गत सीईओ स्वामी यांनी संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा घेतलेला वसा आणि त्यातून प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यातील बहुतांश शाळांनी केलेले भरीव काम याचा आढावा घेऊन तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल कौतुकाची थाप दिल्याने माळशिरस तालुक्याच्या शैक्षणिक टीमचा उत्साह आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला.
भेटीप्रसंगी माळशिरस तालुक्याचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , गटविकास अधिकारी श्रीकांत खरात , सरपंच अमर जगताप, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते, ग्रामस्थ हनुमंत पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, केंद्रप्रमुख दत्तात्रेय झेंडे यांच्या उपस्थितीत कारुंडे शाळेचा कौतुक सोहळा पार पडला.



















