सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा पदभार डॉ. बी. टी. दुधभाते व डॉ. सोनिया बागडे या दोघांना दिल्याचे दोन वेगवेगळे आदेश निघाल्याने गोंधळ उडाला होता. मात्र बुधवारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे या ‘डीएचओ’च्या खुर्चीवर बसल्याच्या दिसून आल्या. त्यामुळे एक आदेश रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली. दरम्यान पत्रकारांनी डॉ बागडे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा पदभार सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. दूधभाते यांच्याकडे देण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी मनीषा आव्हाळे यांनी जारी केला. त्यानंतर सायंकाळी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. बागडे यांच्या नावे तसाच आदेश निघाला. एकाचवेळी दोन आदेश निघाल्याने आरोग्य विभागात गोंधळ उडाला.
दरम्यान आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हे दोन आदेश निघाले. डॉ बागडे या यांना सेवाज्येष्ठतेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार मिळाला आहे. सुरूवातीला सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. दूधभाते यांच्या नावाचा आदेश निघाला होता मात्र ते सिनियर नसल्याचे समजल्यावर त्यांचा आदेश रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.



















