सोलापूर : होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील अकरा दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या समोर चक्री उपोषण सुरू आहे. बुधवारी टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने पत्र देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास बुरा, निलेश फोफलिया गजानन बोकाडे, जगदीश कोडम, वेणूगोपाळ अल्ली, जयंत आकेन, सदानंद कोडम, वेणू कोंकत्ती, अमर दासरी, श्रीकांत येमुल, सुरेश नक्का, मिनेश बुरा, सदानंद कोडम, मल्लेशी सुरवसे, संतोष परदेशी, प्रतिक्षित परदेशी, सचिन परदेशी, आनंद मेहता हे कारखानदार उपस्थित होते.
अध्यक्ष बुरा यावेळी बोलताना म्हणाले, सोलापुरातील बंद असलेले होटगी रोड येथील सुसज्ज असलेले विमानतळ सुरू झाल्यास टेक्स्टाईल उद्योगाला मोठी चालना मिळेल. सोलापुरात विमानसेवा नसल्यामुळे परदेशातील चादर-टेरीटॉवेल आयातदार, देशांतर्गत मोठे व्यापारी, एजंट आदी सोलापुरातील उद्योजकांशी व्यापार करण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे येथील टेक्स्टाईल उद्योगाच्या प्रगतीला मर्यादा येत आहेत. म्हणूनच येथील विमानसेवा त्वरित सुरू केल्यास टेक्स्टाईल उद्योगासोबत गारमेंट, फार्मासिटीकल इत्यादी उद्योगाच्या प्रगतीला चालना मिळू शकेल. यासाठी ‘सोलापूर विकास मंच’ च्या माध्यमातून जे अविरत आंदोलन चालू आहे, त्याबद्दल आम्ही सर्व टेक्स्टाईल उद्योजक शतशः आभारी आहेत. टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फौंडेशन (टीडीएफ) तर्फे या आंदोलनास जाहीर पाठींबा देत आहे.



















