सोलापूर : महाराष्ट्र राज्याचा समतोल औद्योगिक, आर्थिक विकास साधण्यासाठी तसेच नवीन उद्योग घटकांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी व रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या औद्योगिक धोरण २०१९ नुसार मिळणाऱ्या सबसिडी संबंधी येथील टेक्स्टाईल उद्योजकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे त्याचा लाभ घेण्यास कमी पडतात, अशी खंत औद्योगिक सबसिडी तज्ञ ॲड. संदीप येळवे यांनी व्यक्त केली.
टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने आयोजित चर्चासत्रामध्ये औद्योगिक सबसिडी तज्ज्ञ ॲड. संदीप येळवे यांचे टेक्स्टाईल उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाची सबसिडी/अनुदान योजना या विषयावर LCD projector च्या सहाय्याने मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीनिवास बुरा, गोविंद झंवर हे उपस्थित होते.
ॲड. येळवे म्हणाले, महाराष्ट्र औद्योगिक धोरणामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या धोरणामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सबसिडी म्हणजेच आर्थिक प्रोत्साहने मंजूर करण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तालुके हे ५० ते ६० टक्के सबसिडीच्या मर्यादेत आहेत. एखाद्या नवीन उद्योगाचे स्थिर भांडवल दहा कोटी रुपये असल्यास त्या उद्योगाला सहा कोटी रुपये आर्थिक प्रोत्सानाच्या म्हणजे सबसिडी स्वरूपात दहा वर्षात टप्प्याटप्प्याने मिळतील. जुन्या उद्योगांनी जर विस्तारीकरण किंवा नवीन उत्पादन चालू केले असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो.
ते पुढे म्हणाले, महिला उद्योजकांच्या वाढीसाठी आर्थिक सहाय्य पुरवून राज्यातील महिलांना अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील महिला उद्योजकांना ८० टक्के सबसिडी देण्यात येते.
या चर्चासत्रास यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, निलेश फोफलिया, संजय मडूर, जयंत आकेन, आकाश कमटम, गोविंद बुरा, जगदीश कोडम, सिद्धार्थ अल्ली, लक्ष्मिकांत गड्डम, वेंकटेश नल्ला, सिद्धेश्वर गड्डम, सुरेश नक्का, श्रीकांत येमूल, विकास गड्डम यांच्यासह सोलापुरातील जवळपास १५० उद्योजक उपस्थित होते.



















