जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, तिन्हे, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिन्हे, ता. उत्तर सोलापूर येथे भेट देऊन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी तसेच परिसर स्वच्छतेची पाहणी केली. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधा तपासल्या.
त्यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गोडसे हे विनापरवाना रजेवर असल्याचे दिसून आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध साठा नोंदवही उपलब्ध नव्हती. त्यामुळे गोडसे, वैद्यकीय अधिकारी व श्रीमती राऊतराव वैद्यकीय अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिऱ्हे येथे भेट दिली असता सर्व शिक्षकांची उपस्थितीची पाहणी करण्यात आली. तीन शिक्षक रजेवर असल्याचे निदर्शनास आले. इयत्ता ५ वीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जनाचे आकलन चांगले असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना चांगले ज्ञानार्जन करून उज्वल भविष्य घडविण्याच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार अंतर्गत शिजविलेल्या मध्यान्ह भोजनाचा आहाराची चव घेतली असता साधरण असल्याचे दिसून आल्यामुळे सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
सबंधित अभिलेखाची पडताळणी केली असता आहार साठा नोंदवही उपलब्ध झाली नाही. उपस्थित विद्यार्थी व शिजविलेला आहार यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले. शासनाने ठरविलेल्या पाककृतीनुसार आहार दिला जात नसल्याचे निदर्शनास आले. धान्य साठवणूक खोलीची पाहणी केली असता मटकीस जाळ्या लागल्याचे निदर्शनास आल्याने सबंधित मुख्याध्यापक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना देण्यात आले.