सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक 1 यांच्या वतीने सभासदांच्या दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त पाल्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना सीईओ दिलीप स्वामी संबोधित करीत होते.
यावेळी बोलताना दिलीप स्वामी म्हणाले, दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता मिळवून थांबू नका. तुमच्या यशाचा आलेख हा चढता राहिला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे असेल तर शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आतापासूनच करायला लागा. फक्त तासंतास अभ्यास करूनच यशस्वी होता येते असे नाही. स्पर्धा परीक्षांची संपूर्ण माहिती घेऊन त्याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन करा.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, पंडित भोसले यांनी मार्गदर्शन केले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, पतसंस्थेचे चेअरमन विवेक लिंगराज, व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर उपस्थित होते.
पुढे बोलताना सीईओ दिलीप स्वामी म्हणाले की पतसंस्था क्रमांक एक नेहमीच गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत असते. पतसंस्थेचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. गुणवंतांना प्रोत्साहनाचे चांगले उदाहरण म्हणजे सभासदांच्या गुणवंत पाल्यांबरोबरच जिल्हा परिषदेचे गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त महेश शेंडे यांचाही सत्कार यावेळी त्यांनी आयोजित केला.
यावेळी अक्कलकोट येथील पशुसंवर्धन विभागातील परिचर राजेंद्र जाधव यांची कन्या रुपाली राजेंद्र जाधव हीचा एम पी एस सी मधून पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सकाळचे उपसंपादक प्रमोद बोडके यांचा महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी दहावीत गुणवत्ता प्राप्त 40 व बारावीच्या 10 विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ शत्रुघ्न माने यांनी केले तर आभार व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर यांनी मानले.
.