सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील काही वादग्रस्त कर्मचाऱ्यांच्या चौकशीचा विषय सध्या गाजत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या तक्रारीवरून राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातल्या 11 कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते त्या चौकशीचे काय झाले? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मनीष काळजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना 29 डिसेंबर 22 रोजी पत्र देऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागात बेकायदेशीरपणे कामकाज करत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. यामध्ये प्रामुख्याने जि.प. आरोग्य विभाग सोलापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात यांनी बार्शी येथे कुटूंब कल्याण घोटाळा, माढा येथे साहित्य खरेदी घोटाळा, मोहोळ येथे चेक गहाळ प्रकरण, राष्ट्रीय आरोग्य अभियानामधुन ब्लॅक लिस्टमधील वाहनांची नेमणुक व त्या वाहनांची बिले अदा करणे, लॅपटॉप चोरी प्रकरण, म्हंता या कर्मचान्यास मारहाण करणे आदी गंभीर प्रकार, कामात अनियमितता असणे तसेच निलंबीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना अनेक घोटाळ्यांमध्ये सहकार्य केल्याने त्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे.
तसेच तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव यांच्याशी संबंधीत रवी जाधव, डॉ. अनिरुध्द पिंपळे, सुनिल लिंबोळे, रफिक शेख, डॉ. इरफान सय्यद, डॉ. संतोष जोगदंड, डॉ. श्रीकांत कुलकर्णी. गजेंद्र कुमठेकर, केदार गददी, सचिन कुलकर्णी, दिपक कुलकर्णी, सिध्देश्वर कटटीमनी. सी. पी. पवार, महेश जाधव, निखिल राऊळ, टी बी येथील एक्स रे टेक्निशियन जमादार, समिर शेख या सर्वांमार्फत तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव हे कामकाज चालवत होते. तरी या सर्वांची आलेल्या तक्रारीवरुन चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी. या पत्रावर आरोग्य मंत्री सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अ व ब प्रमाणे तात्काळ कार्यवाही करून अनुपालन अहवाल सादर करावा अशा सूचना 28 जानेवारी 2023 रोजी दिल्या होत्या त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे.



















