सोलापूर : बुधवारी सोलापूर जिल्हा परिषदेला दोन आमदारांनी भेट दिली. यामध्ये सकाळच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे माजी सरकार मंत्री तथा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि सायंकाळच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यावर आपली पकड असलेले करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे.
या दोन नेत्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढ भागात गेलेल्या शाळांविषयी आपली भूमिका मांडली होती. आमदार सुभाष देशमुख हे जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी आक्रमक आहेत तर त्याला आमदार संजयमामा शिंदे यांचा विरोध आहे. कारण जिल्हा परिषदेची ही मोठी मालमत्ता आहे. ती महापालिकेच्या ताब्यात देण्यास केवळ संजयमामा नाहीच तर संपूर्ण जिल्ह्यातील नेत्यांचा विरोध आहे.
सायंकाळच्या सुमारास आमदार संजयमामा हे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या कार्यालयात बसले होते. यावेळी काही पत्रकारांनी त्यांच्यासोबत चर्चा करताना जिल्हा परिषदेच्या हद्दवाढ भागातील शाळांचा विषय काढला. यावेळी मामा हे महापालिकेला शाळा हस्तांतर करण्याच्या विरोधावर ठाम दिसून आले.
शाळा दुरुस्तीसाठी केवळ आपण एनओसी देऊ शकतो असे सांगत सध्याच्या महापालिका शाळांच्या अवस्था काय आहे यावर कोणी विचार करत नाही बऱ्याच शाळाची मैदानी राजकीय नेत्यांनी कब्जा केली आहेत आणि एकदा महापालिकेच्या ताब्यात झेडपीची मालमत्ता केली तर त्या मालमत्तेला हस्तांतर करण्यासाठी शासनाकडे कोणतीही परवानगी मागावी लागत नाही अशी भूमिका त्यांची दिसून आली.
जिल्हा परिषदेच्या कामकाजावर यावेळी बराच वेळ चर्चा झाली. जिल्हा परिषद ही अशी संस्था आहे की ज्यातून विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी नेता येतो. सर्वसामान्यांच्या संपर्कात राहता येते. त्यामुळे काम करायला मोठी संधी जिल्हा परिषदेत आहे जर जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाचे आरक्षण नसते तर मी आमदारच झालो नसतो असे संजयमामा यांनी सांगत जिल्हा परिषदेचे महत्त्व विशद केले.

















