मराठी चित्रपटसृष्टीतील रुबाबदार, देखणा नायक आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाच्या बातम्या आल्या आहेत. ते 82 वर्षांचे असून. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांच्या नातेवाईकांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले असून निधनाची अफवा पसरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
जुन्या काळातील अभिनेत्री दुर्गाबाई कामत यांचे पणतू, त्यांच्या कन्या कमलाबाई गोखले यांचे नातू आणि अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र असल्याने विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा घरातूनच लाभला होता. महानंदा, बाळा गाऊ कशी अंगाई, कळत नकळत, वजीर असे मराठी चित्रपट तर कमला, बॅरिस्टर, संकेत मिलनाचा, नकळत सारे घडले अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचं सामर्थ्य दाखवलं. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला असा ठसा उमटवला. भूलभुलैय्या, हम दिल दे चुके सनम, अग्निपथ अशा अनेक चित्रपटांमधूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. अग्निहोत्र, अल्पविराम, या सुखांनो या अशा मराठी- हिंदी मालिकांमधूनही ते झळकले आहेत.



















